
प्रफुल्लित विद्यार्थी, ज्ञानाची भूक भागवणारे उपक्रम, कला गुणांना वाव देणारे गुरुजन असणारी शाळा हीच माझी स्वप्नातील शाळा
ग्रेट भेट उपक्रम
जि.प.थुंगाव निपाणी
तालुका प्रतिनिधी/दि. 26 फेब्रुवारी
समाजात निरनिराळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींच्या गाथा त्यांच्याच समक्ष त्यांच्याच शब्दात उकल करून विद्यार्थ्यांच्या भविष्याला शाश्वत चाकोरी निर्माण देणारा उपक्रम म्हणजे ग्रेट भेट.
जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुगाव निपाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या याच ग्रेट भेट उपक्रमात आजचे पुष्प गुंफले ते काटोल गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांच्या मुलाखतीने. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना वाट मोकळी करून देतांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना आयुष्यात वाचनाला आणि अभ्यासासोबतच खेळाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे मत व्यक्त केले. इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी अधिकाधिक शब्दांचा साठा वाढवण्यासाठी अगदी सोप्या प्रश्नांनी घरात संवाद साधणे, इंग्रजी बातम्या ऐकणे आणि वाचणे यासोबतच विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील कात्रणे काढण्याची सवय करावी अशी सूचना केली. नोकरी सांभाळत असतांना अभ्यासाचा मेळ कसा घालता? या प्रश्नाला उत्तर देताना वेळ मिळत नसतो तो काढावा लागत असल्याचे आणि येणाऱ्या अडचणींना संधी समजून काम करावे असे मत मांडले. शाळा ही केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणारी नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी , विषयनिहाय प्रयोग कक्ष असलेली, विचारांना मुक्त आकाश उपलब्ध करून देणारी असावी असे सांगून मला अश्या शाळेचा घटक व्हायला आवडेल अशी इच्छा या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त केली. मुलाखतीचे संचालन नूतन गोरे, हिने तर आभार प्रदर्शन प्रणाली देशमुख हिने केले. प्रश्न निर्मिती आणि सादरीकरणासाठी यश चौधरी, पार्थ हिवसे सलोनी चौधरी, निकिता हनवते, सुजल नासरे, आरुषी टेकाडे, समृद्धी लोहे, मोनिका देशमुख, नयन देशमुख, आर्या दिग्रसकर, रिया चौधरी, दिव्या देशमुख, यामिनी हनवते यांनी सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक धनंजय पकडे, शिक्षक संदीप बागडे, शिक्षक निलेश शहाकार, स्वयंसेविका दिपाली हिवसे, स्वयंसेविका संध्या नागपूरे उपस्थित होते.
