कृषी उत्पन्न बाजार समिती ने फसगत झालेल्या शेतकऱ्यांना दिले धान्याचे पैसे

एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षे नंतर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल.


नितेश ताजणे /वणी.

वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परवाना धारक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याचे शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी व बाजार समितीची फसवणूक करणाऱ्या धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यां विरोधात पोलिस स्टेशनला एक महिन्या अगोदर तक्रार करण्यात आली होती.वणी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या परवानगी नंतर शेतकरी व बाजार समितीची फसगत झाल्याचा व कोट्यावधी फसवणूक करण्याऱ्या दोन धनाढ्य व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची धान्याची व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी धान्याचा हर्हास लावून चढाईच्या दराने धान्य खरेदी करतात. बाजार समितीच्या नियमाने व नियंत्रणात हा धान्य खरेदीचा हा व्यवहार चालतो. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणलेल्या शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीचा परवानाधारक आरोपी व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट, दत्त मंदिर याने खरेदी केले. या व्यापाऱ्याची रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर याने हमी घेतली होती.शेतकऱ्यांचे धान्य घेतल्यानंतर व्यापारी व जमानतदार दोघेही धान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. धान्य खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम कास्तकाराच्या खात्यात जमा होणे अनिवार्य असते. पण महिना लोटूनही कास्तकारांना अद्याप धान्याचे चुकारे मिळाले नाही. व्यापाऱ्यांना वारंवार नोटिसा बजावूनही ते धान्याची रक्कम अदा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कास्तकार व बाजार समितीची त्यांनी फसवणूक केल्याचे दिसून येते. या व्यापाऱ्यांनी १४७ कास्तकारांकडून जवळपास १९३५.०२ क्विंटल धान्य (चना, तूर, सोयाबीन) खरेदी केले असून त्या धान्याचे बाजार मूल्य १ कोटी १३ लाख ७८ हजार १३१ रुपये एवढे आहे. बाजार समितीचे सेवा शुल्क देखिल या व्यापाऱ्यांनी भरले नसून ८५ हजार ३३५ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत आहे. कास्तकार व बाजार समितीचे मिळून १ कोटी १५ लाख २६ हजार ४६ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत असून पैसे देण्याची त्यांची नियत नसल्याने ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.फसगत करण्याचे उद्देशाने खरेदी करून पोबारा होण्याची मानसिकता असलेल्या या महाशयांनी गुन्हे दाखल होणार असल्याचे कळताच त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठीही प्रयत्न केले होते. धीरज सुराणा हा बाजार समितीचा परवानाधारक व्यापारीआहे या व्यापाऱ्यांचे अनेक फसगतीचे किस्से चर्चेत आहे.अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या फगातीने त्यांना आर्थिक संकटात टाकले आहे.यांच्या विरोधात बाजार समितीचे सचिव अशोक काशीनाथ झाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि च्या कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात शिवाजी टिपूर्णे करीत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला धान्य विक्रेत्या शेतकऱ्यांना आधार.दोन ते तीन महिन्यानंतरही व्यापारी शेतकऱ्यांना धान्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करित होते, तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भेटी घेऊन समस्या सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचा भेटी घेतल्या असता टाळाटाळ केली व त्यांनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने या बेईमान व्यापाऱ्यां विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
व अति अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने जवाबदारी उचलुन काही प्रमाणात पैसे दिल्याने धान्य विक्रेत्या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला हे निश्चित.