
कोरोना काळात सर्व प्रकारचे कामे बंद पडली होती. त्यातच मजुरांसाठी बांधकाम हा मुख्य रोजगार मिळणारा व्यवसाय असल्यामुळे तोही बंदच होता मात्र यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने आता घरांच्या बांधकामास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली असून रेतीची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र यादरम्यान काही रेती तस्कर मॅजिक पेन चा वापर करून एका पेक्षा अधिक फेऱ्या मारत शासनाचा लाखोंचा महसूल बुडविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वणी उपविभागातील काही रेतीघाटांचा लिलाव करून त्यातील रेतीचा उपसा करण्याची मुदत १० जूनपर्यंत असतांनाही काही घाटांवरुन दिवस-रात्र अवैध वाहतूक सुरू असुन त्यांना महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या एका ‘रॉयल्टी’चा वारंवार वापर करण्यासाठी ‘मॅजिक पेन’चा खुलेआम वापर केला जात आहे. रेतीतस्करांचा हा जुनाच फंडा असून, काही दिवसांपूर्वी शहरातील शेतकरी मंदीर जवळ एका नायब तहसिलदारांनी भर दुपारी रेती घेऊन जात असलेल्या एका हायवा ट्रक ची तपासणी केली असता रॉयल्टी वर चक्क मॅजिक पेनचा वापर केल्याचे दिसून आले होते हे विशेष. शासनाची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात येणारा हा ‘पेन’ पुन्हा अवतरला असून, त्याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही.
१०० रुपयांपासून मिळणारा हा ‘मॅजिक पेन’ सर्वाधिक रेतीतस्कर वापरतात. ते या पेनच्या मदतीने रेती वाहतुकीच्या ‘रॉयल्टी’वर खोडतोड करतात. या पेनने रॉयल्टी पावत्यांवर लिखाण करून त्यांना आगकाडी किंवा ‘लायटर’च्या सहाय्याने थोडी उष्णता दिल्यास पावत्यांवरील सर्व शाई नाहीशी होते. ‘रॉयल्टी’वर नमूद असलेली रेती वाहतुकीची तारीख व वेळ या पेनच्या मदतीने मिटवून ती कोरी केली जाते. त्याच ‘रॉयल्टी’वर नवीन तारीख व वेळ नमूद करून ती पुन्हा वापरात आणली जाते.
त्यामुळे रेतीतस्कर एकच ‘रॉयल्टी’ कित्येकदा सहज वापरतात. महसूल किंवा पोलीस विभागाच्या कारवाईमध्ये रेतीचे ‘ओव्हरलोड’ ट्रक पकडले तरी त्यांच्याकडे असलेल्या ‘रॉयल्टी’कडे बारकाईने कुणीही बघत नाही. त्यामुळे हा ‘मॅजिक पेन’ शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत ठरत आहे. तालुक्यातील वणी, शिरपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेतीघाटांमधून रेती घेऊन निघालेल्या प्रत्येक ट्रक किंवा टिप्परच्या चालकांकडे ‘मॅजिक पेन’ वापरलेली ‘रॉयल्टी’ प्रत्यक्ष पाहणी केल्यास आढळून येईल असे बोलले जात आहे. रेतीची ही वाहने ‘ओव्हरलोड’ असतात. बहुतांश रेतीतस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने तसेच त्यांचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यानेच शासनाने केलेल्या नियमांचे पालन कुणीही करीत नाही.
फेऱ्यांचा गौडबंगाल
मोठ्या ट्रकला प्रत्येकी चार ब्रासची ‘रॉयल्टी’ दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्या ट्रकमध्ये किमान सहा ब्रास रेती नेली जाते. ‘रॉयल्टीवर नमूद असलेल्या वेळेत एकापेक्षा अधिक फेऱ्या केल्या जातात.
