राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील शेतात जळून शेतकर्त्याचा मृत्यू, सांत्वनाच्या सौजन्यचाही लोकप्रतिनिधीना विसर

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

  अक्षरशः देहाची राखरांगोळी होणे, स्वतःच लावलेल्या आगेच्या ज्वाळानी जीवनयात्रेचा करूण  अंत घडून येणे . उतार वयातील हा असा मृत्यू वेदनादाईच. ज्याच्या वाट्याला तो आला त्याच्याही करीता व मागे राहिलेल्या आप्त -परिवाराकरीता सुद्धा. मात्र याही पलीकडे या मृत्यूला एक दुर्देवी किनार आहे ती आहे उपेक्षेची. लक्ष्मणराव दौलतराव भोंग वय वर्ष 82 या शेतकऱ्याचा शेतात जळून मृत्यू झाला. मात्र त्याची दखल घेण्याचे सौजन्य लोकप्रतिनिधी वा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत दाखवले नाही. गुजरी येथील या शेतकऱ्याने याची देही याची डोळा हा मरणाचा अंतिम सोहळा पहात प्राण सोडला.    
    लक्ष्मणराव भोंग हे गुजरी येथील सभ्य गृहस्थ. हयातभर शेतीत काबाडकष्ट केले. उर्वरित वेळेला हरिनामाला वाहून घेतले. घरी स्वतः ची पाच एकर जमीन. तीन मुलं, नातवंड भरले-भुरले घरं. पाच एकर जमिनीत गुजराण होतं नाही. या करीता यंदा त्यांनी लगतच्या शिवारातील तीन एकर जमीन मक्त्याने केली. या जमिनीत आधी गहू लावल्या गेला होता. गव्हाच्या या खेवलीत गव्हाचे ताठे जाळन्याकरीता लक्ष्मणराव गेलें. तो दिवस होता शनिवार, हनुमान जयंती च्या दिवशी भर दुपारी त्यांनी गव्हाची खेवल टायर नी पेटवली. अर्धे अधिक वावर पेटवून झाले. मात्र त्या जळत्या टायरचा पेटलेला थेंब त्यांच्या धोतरावर पडला. आणि घात झाला. शरीराने पेट घेतला. दुपारच्या उन्हात आसपास देखील कुणी नव्हते. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अनावधानाने का असेना पण स्वतःच स्वतः ला जाळून घेतल्यागत भीषण प्रसंग या शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. सम्पूर्ण पंचक्रोशीत या मृत्यू बाबत हळहळ वेक्त झाली. आयुष्यभर प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्या माणसाला असे मरणं का यावे या बाबत दुःख वेक्त करत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मृत्यू कुणाला कधी कसे गाठील याचा नेम नाही असा सूर आळवत दुःखी अंतकरनाणी माणसं मार्गस्थ झाली. 
   या मृत्यू उपरांत शेतात जळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबाची लोकप्रतिनिधी व प्रशासन दखल घेईल अशी अपेक्षा होती. निदान या कुटुंबाचे सांत्वन करण्याचे सौजन्य अपेक्षित होते. मात्र या गँभीर घटनेची दखल काही कुणाला घ्यावि वाटली नाही. सर्वपक्षीय नेते सध्या विविध लग्नादी प्रसंगी आवर्जून भेट देऊन सोशल मीडियावर वारेमाप प्रसिद्धी चा स्टंट करतांना दिसतात. मग शेतांत जळून अंत झालेल्या शेतकर्त्यांच्या कुटुंबाला मात्र यांना भेट देता येतं नाही. लग्नादी प्रसंगात मारे कोमल  हास्य चेहऱ्यावर फुलवून जणू काय जेवणावळीचा खर्च मीच केला असा आव आणणार्यांना अस्या घटनेचा विसर पडतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होतं आहे.  लोकप्रतिनिधी व प्रशासनाची ही संवेदनहीनता तालुक्यात चर्चेचा विषय झाला नसता तर नवल तसा तो झाला आहेच. 'माझ्या मना बन दगड ' ही  मन मरून जाण्याची शिकवण अधिकारपदावर गेल्यास आपोआप वेक्तीमत्वात प्रवेशत असावी का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. उत्तर मात्र भेटत नाही..