चौपदरीकरणाला विलंब ठरतोय अपघाताला निमंत्रण, डहाणू बस उतरली रस्त्याच्या कडेला

प्रतिनिधी: श्री. चेतन एस. चौधरी

नंदुरबार :- नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली. त्यात बस मातीत फसली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
नंदुरबार- डहाणू बस नेहमीप्रमाणे नवापूर च्या दिशेने मार्गस्थ झाली होती. विसरवाडीच्या पुढे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर एका कंटेनरने बस ला हुलकावणी दिली. परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. पुढे बसमधील लहान बालके व महिलांना पाच ते सहा प्रवाश्यांना किरकोळ मुक्कामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात बस असल्याने ट्रॅक्टरला टोचन लावून बसला बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांना बसवून बस रवाना करण्यात आली. धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामात अनेक अनियमितता असल्याने नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे; याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.