
अखेर मनसेच्या लढ्याला यश
महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयाला व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रक्ताचे नमुने घेऊन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या हिंद लॅब मधील कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.
एप्रिल महिन्यात निवेदनाद्वारे समस्यांचा तोडगा निघावा यासाठी मागणी केल्यानंतरही कंपनीकडून कोणताही पाठपुरावा न झाल्याने मनसेने कामगारांच्या विविध मागण्या मान्य कराव्या यासाठी दीडशे कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू होते.
अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या या आंदोलनात सामान्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांनी सेवा देण्याची हमी यावेळी दिली होती. परंतु हे आंदोलन मोडून काढण्यासाठी विविध स्तरावर कंपनीने प्रयत्न केले, तसेच कामगाराना भडकावून हे आंदोलन सुरू असल्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
परंतु अत्यल्प पगार वाढती महागाई, कोणताही लाभ न देता कपात करण्यात येणारे इन्शुरन्स चे पैसे, पगारी रजा व वरिष्ठांकडून देण्यात येणारे अवाजवी टार्गेट या विविध मागण्या कामगारांच्या हक्काच्या असून यावर तोडगा निघावा यासाठी दोनदा कामगार व कंपनी प्रशासनाकडून बैठक घेण्यात आली परंतु कंपनी च्या आडमुठ्या भूमिकेमुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही अखेर आक्रमक भूमिका घेत कामगारांच्या कुटुंबाला घेऊन आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कंपनी प्रशासनाने शुक्रवार ला विश्रामगृह येथे मनसेचे शिष्टमंडळ व कामगार यांची बैठक घेतली. यावेळी सर्व मागण्या मान्य करत कामगारांना कामावर रुजू होण्याची विनंती कंपनी प्रशासनाने केली.
यावेळी कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यन्त पाठीशी उभं राहून लढा दिल्याबद्दल कामगारांकडून राहुल बालमवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हा विजय कामगारांचा संयम व एकजुटीचा असल्याची भावना राहुल बालमवार यांनी व्यक्त केली.
सदर बैठकीत मनसेचे ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, अक्षय चौधरी, तालुकाउपाध्यक्ष मयूर मदनकर, तालुकासचिव करण नायर व शेकडो कामगार उपस्थित होते.
