
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपुर: स्थानिक महानगरपालिकेतील 65 नाली सफाई कामगारांपैकी केवळ 35 कामगारांना कामावर घेण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित नाली सफाई कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. या सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.
मनपाकडे नाली सफाईच्या कामाकरिता 65 कंत्राटी कामगार आहे. कोरोना काळात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी या सर्व कामगारांनी आपले कर्तव्य बजावले मात्र आता यातील केवळ 35 कामगारांना कामासाठी राखीव ठेवण्यात आले. परिणामी कामगार बेरोजगार झाले आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे कामगार बेरोजगार असल्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेता ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेण्यात आली असून सदर बेरोजगार कामगारांना काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील घाण काढून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांवर अन्याय करणे योग्य नसून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्तांनी रोटेशन पद्धतीने या कामगारांना काम देण्याचे मान्य केले आहे.
यावेळी ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्हारप, अल्पसंख्यांक विभागाचे शहर संघटक सलीम शेख, महिला आघाडी शहर संघटिका वंदना हातगावकर, करण सिंग बैस, राहुल मोहूर्ले, दुर्गा वैरागडे यांच्यासह नाली सफाई कामगारांची उपस्थिती होती.
