राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन २३ दिवस होत आले आहेत. या २३ दिवसांत राज्यात ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र सत्तेच्या संघर्षात राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नाही, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सरकार वाचविण्यासाठी दिल्ली वाऱ्या करत आहेत. मध्येच वेळ काढून कॅबिनेट बैठक घेतात आणि महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलून टाकतात, असा ईडी सरकारचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरु आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अनेक जिल्ह्यांत शेतीची वाताहत झाली असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला राज्यात कृषी मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असे कुणीच नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आल्याचे दावे करणाऱ्या या ‘डबलसीट’ ईडी सरकारचा शेतकऱ्यांप्रती असलेले ‘डबल स्टँडर्ड’ जनतेला दिसून येत आहेत.
