राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे,रस्ता दुरुस्त करण्याची वाहनचालकांकडून मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात खड्डे पडले असून अपघाताच्या शृंखलेत वाढ झाली आहे. वडकी ते करंजी महामार्गावरील खड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी तसेच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भागात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांतून होत आहे. वडकी ते करंजी या मार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस हे खड्डे अधिकच वाढत आहेत. येथे सुमारे दोन ते चार फूट रुंद तर इंचाहून अधिक खोलीचे खड्डे पडले असून या वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रवासादरम्यान चांगलीच कसरत करावी लागत आहे.
महामार्ग असल्याने वाहने ही भरधाव वेगात येत असतात. जेव्हा खड्डा दृष्टिपथात येतो तेव्हा वाहनचालक वेगनियंत्रित करताना अपघात होऊ शकतो. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा खड्यामध्ये पाणी साचलेले असते, अशावेळी दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यांचा तोल जाऊन अपघात होत आहे. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयातून वाहन गेल्यामुळे वाहनचालकांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
करंजी ते बडकी या १५ किलोमीटर रस्त्यावर मागील १५ दिवसात २५ हून अधिक अपघात झाले आहे. येथील खड्डे बुजविण्यात यावे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी विद्यार्थ्यांसह वाहनचालकांतून होत आहे.

         

राष्ट्रीय महामार्गावर सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. यानंतरही रस्ता दुरुस्तीच्यादृष्टीने संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नाही. यामुळेच अपघाताच्या घटना वाढत आहेत. शिवाय, चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या अपघातातही वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दररोज अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणेने सहकार्य करावे. -विनायक जाधव, ठाणेदार, पोलीस स्टेशन वडकी