साहेब वावरात पाणी हाय ,राहाले घर नाही ,झेंडा लावू कुठं?


शेतकरी आत्महत्येची मालिका सुरु असतांना हर-घरं तिरंग्याच्या अट्टाहास
(माय-बाप सरकार चे डोके ठिकाणावर आहे का, म्हणण्याची वेळ)

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

हुकूमत भी किसानों पे गजब के एहसान करती है,
lआँखे छीन लेती है और चस्मे दान करती है
– राष्ट्रभक्ती शिकवण्याची हौस काही माय बाप सरकार ला स्वस्थ बसू देतं नाही. ज्या शेतकर्यांने आज पर्यंत या देशाला जगवलं त्याला वेगळी राष्ट्रभक्ती शिकवायची गरज नाही. त्यातही तो नापिकीने आत्महत्या करत असेल तेव्हा त्याला घरावर तिरंगा लाव म्हणन्याचे औचित्य विसंगती ठरते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभिमान सर्वांना आहेच पण एखाद्याचे डोळे काढून घ्यायचे आणि त्याच वेळी त्याला चष्मा घालायला लावायचे हे न्याय नाही. वरील ओळीतून हाच आशय अधोरेखित होतो. शेतकरी आत्महत्येत वाढ होतं असतांना हे घडणे दुर्देवी म्हणावे लागेल. राळेगाव तालुक्यात एकाचं आठवड्यात तीन शेतकऱ्यांनी नापिकीचे संकेत , अतिवृष्टी, व पूर या मुळे आत्महत्या केल्या. अनेक शेतकरी फार मोठ्या विवनंचनेत आहे. अशा वेळी या शेतकऱ्यांनी नेमका कोणता झेंडा हाती घ्यावा ही चिंता पडल्याचे दिसते.
राळेगाव तालुक्यातील विक्रमी पावसाने मागील पंढरवाड्यात कळस गाठला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद तालुक्याच्या वाट्याला आली. 11 गावे पाण्याखाली गेली. शेकडो हेकटर मधील पीक खरडून गेलें. घरांचे अतोनात नुकसान झाले. नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने आधीच कर्जाच्या बोज्याखाली दबलेला शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले. पूर ओसरला मात्र आत्महत्येची लाट काही ओसरली नाही. तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा सम्पविली. एकाचं आठवड्यात झालेल्या या तीन शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय ठरल्या. हे सत्र सुरु राहण्याचा धोका वाढला आहे. शासन, प्रशासन व विरोधीपक्ष यांनी एकत्रितपणे धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आली आहे.
वडकी पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या रिधोरा येथील युवा शेतकरी विशाल लिलाराम लेनगुरे (41) यांनी 18 जुलै रोजी वर्धा नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा सम्पवली. त्यांचेवर बँकेचे व खाजगी कर्ज होते. सम्पूर्ण शेत पाण्याखाली दबले आता कर्ज फेडायचे कसे, आत्महत्या खेरीज मार्ग नाही असे ते वारंवार म्हणतं होते. पत्नी कांचन ने त्यांना धीर देतं ही वेळ निघून जाईल. आपण पुन्हा कष्ट करू हा दिलासा दिला. मात्र त्यांनी टोकाचा निर्णय घेतलाच. त्या पाठोपाठ रावेरी येथील लक्ष्मण कवडूजी शेंडे ( 45) या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. कारणं तेच. सततचा पाऊस, शेतातील नष्ट झालेले उभे पीक ! या दुर्देवी घटनांची शाई वाळते न वाळते तो धानोरा येथील प्रवीण सुरेश वाघ ( 37 ) या शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी विष प्राशन केले. यवतमाळ शासकीय रुग्णालयात शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. अतीवृष्टी चा फटका बसल्याने या शेतकऱ्याने जीवन सम्पविले.
विशेष म्हणजे या तीनही शेतकरी आत्महत्या या अतिवृष्टी नंतर घडल्या. आज शेतकरी कमालीचा विवनचनेत आहे. गावोगावी भकास, उदास परिस्थिती आहे. नागपंचमी सारखा सण होऊन गेला. हे कळले देखील नाही. राळेगाव तालुक्यातील राळेगाव शहरासह कोणत्याच गावातील बाजारात गर्दी नाही. किराणा, भाजीपाला, कपडे, इतर जिन्नस यांच्या दुकानात शुकशुकाट पाहायला मिळाला. खरे तर सणाच्या पूर्वी बाजार गजबजलेला असतो. ‘ शेत पिको कीं न पिको मात्र पेठ पिकत असते ‘ या अर्थाची एक म्हण चांगलीच प्रचलित आहे. ती बाजार नेहमी गजबजलेला असतो या गृहीतकातून जन्मास आली. मात्र यंदा विपरीत स्थिती आहे. पिकाचा हंगाम बराच लांब आहे. पण नापिकीचे स्पष्ट संकेत आजच दिसू लागले. यात शेतकर्यांसोबतच मजुरांची देखील अवस्था दयनीय झाल्याचे दिसते. वाचलेल्या पिकांची वाढच झालेली नाही.अनेकांच्या जमिनी पडीत राहिल्या. मजुरी नाही. शेतकऱ्यांजवळ पैसाच नाही. त्या मुळे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या अर्थाने सर्वत्र एक अनुत्साह दाटुन आलेला पहायला मिळतो. ज्यांचे उभे पीक खरडून गेलें, घरात पाणी शिरले, घरे पडली त्यांचे दुःख वर्णनातीत क्लेषदाई आहेच, मात्र ज्यांची पिके या पासून वाचली ते देखील संकटात आहे. पिकांची वाढच झालेली नाही. दिलेले खत वाहून गेलें. या वेळी कपाशी, सोयाबीन तूर या खरीप पिकाने शेती बहरलेली दिसायची. यंदा ती स्थिती नाही. पोळा सण जवळ येतो आहे. त्या वेळी काही ठिकाणी कपाशी पात्यावर आलेली दिसायची. या वेळी हितभर रोगट कपाशीने शेत व्यापलेले दिसते. प्रत्येक गावकरी आज त्रस्त आहे. या मुळे मनाचा कोंडमारा होऊन त्याची अखेर आत्महत्ये सारख्या टोकाच्या निर्णयात होतांना दिसते.
विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांनी राळेगाव तालुक्यातील झाडगाव, दापोरी शिवाराला भेट देऊन नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली. यवतमाळ येथील पत्रकारं परिषदेत त्यानी तालुक्यात सर्वाधिक हानी झाल्याची प्रतिक्रिया वेक्त करून शास्नानाने त्वरित सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सोबतच जिल्हयातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी बाबत शासनाला आर्थिक मदत देण्यास बाध्य करू असा दिलासा देखील दिला. आज तालुक्यातील शेतकरी मोडून पडला आहे. जगण्याची उमेद सरली कीं सर्व संम्पते. ही स्थिती निर्माण होणे सर्वाधिक घातक आहे. आपले कुणीतरी आहे.माय -बाप सरकार पाठीशी आहे. हा दिलासा देखील महत्वाचा असतो. तो विस्वास गावकऱ्यांना वाटतं नाही. पुढे जाऊन बोलायचे झाल्यास तो विस्वास गमावण्याच्या खेळी राजकीय पटलावर आकारास येतांना दिसतात. . सरकार कोणाचेही असो.ते काय आकडेमोड करून बनवले असो, वा कुणाच्या पाठीत खनजीर खुपसून आकारास आलेले असो हे काहीही असले तरी अंततः त्या सरकारचा मुळ हेतू हा जनतेप्रति उत्तरदाई असला पाहिजे. आरोप – प्रत्यारोप, राजकीय खेळीला सत्ता एकदा का प्राप्त झाली कीं विराम दिल्या गेला पाहिजे. इथे मात्र सारे उलटे घडतं आहे. सरकार व विरोधक निव्वळ आरोप-प्रत्यारोप यातच गुंतल्याचे दिसते. माध्यमे याच गोष्टीला नको तितके महत्व देतं आहे. अतिवृष्टी, नापिकी, शेतकरी आत्महत्या हे विषय ना सरकार च्या केंद्रस्थानी आहेत ना माध्यमांच्या या मुळे शेतकऱ्यांना सरकार आपल्यासाठी काही करेल ही शास्वती वाटतं नाही.
राळेगाव तालुक्यातील या तीन आत्महत्या या युवा शेतकऱ्यांच्या आहेत. घरचा कर्ता माणूस जेव्हा जीवं देतो तेव्हा त्या आधी त्याने खूप काही भोगलेले असते. गमावलेले असते. तात्कालिक कारणं काहीही असो मात्र सर्व बाजूनी अपयश दिसतं असतांना हा टोकाचा निर्णय घेतल्या जातो. या वर्षी नापिकीचे साल दिसतं असल्याने देणेकऱ्यानी आपला हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांना कुणी व्याजाने देखील पैसे देण्यास तयार नाही. दिले तरी ते परत करायची क्षमता नाही. अशी अवस्था एकदंर निर्माण झाली.
विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर नुकसानग्रस्त शेती चे व गावांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले. राळेगाव तालुक्यात 12 हजार हेकटर वरील पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे. यात पुरा मुळे पाण्याखाली आलेल्या गावातील घरांचे, संम्पतीच्या नुकसानीची आकडेवारी वेगळी. स्थानिक प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली.222 लाभार्त्यांना 11.10 लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश तलाठी यांचे मार्फत पाठवण्यात आले. पण ही तुटपुंजी रक्कम तात्कालिक गरजा भागवू शकेल कदाचित पण बळ देऊ शकणार नाही. त्या करीता शासन स्तरावरून ठोस रक्कम मिळण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्य्क ठरेल.
स्वातंत्र्य|चा अमृत महोत्सव साजरा होतं असतांना केंद्राच्या निर्देशांनन्व्ये घरं -घरं तिरंगा ही मोहीम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यला 75 वर्ष होतं असल्याने देशभर या मोहिमेंला गतिमान करण्याचे नियोजन शासकीय पातळीवर करण्यात येतं आहे. खरा भारत हा गावात वसतो असे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला हा नारा त्यांनी दिला होता. भारतीय स्वातंत्र्य आज शतकाकडे वाटचाल करीत असतांना गावोगावी शेतकरी आत्महत्यांचा आक्रोश निर्माण व्हावा व दुसरीकडे घरं -घरं तिरंगा ही मोहीम राबविण्याला शासनाने प्राधान्य द्यावे, या विसंगतीला काय म्हणावे ?
‘ स्वातंत्र्याचा जयजयकार करू कोठल्या स्वराने,
हरेक गावं इथले भासे उदासवाणे,
फासावर जाऊन त्यांनी स्वराज्य दिले आम्हा,
पण जे वावरात मेले, कुठे गेली ती बलिदाने

या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही आणि त्याची कुणाला फिकीरही नाही.