धाडसी चोरी, पाच लाख रुपयाच्या सोन्यासह रोख रक्कम लंपास

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर असलेल्या वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील गजानन बुट्टे यांच्या घरावर मंगळवारच्या रात्री चोरट्यानी डल्ला मारत अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. खांबाडा येथील व्यावसायिक तथा शेतकरी गजानन बुट्टे हे काही कामानिमित्त वणी येथुन जवळच गणेशपुर या गावी आपल्या नातेवाईकांकडे मंगळवार ला गेले होते. तेथेच त्यांनी मुक्काम केला. दि. ०९ नोव्हेंबर बुधवारला जेव्हा ते खांबाडा येथे परतले. त्यावेळेस घरातील समोरच्या दाराचे कुलूप तोडलेले त्यांना दिसले. आणि घरात चोरट्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील
आंगठी, मंगळसूत्र, गोप आदी आठ तोळ्यांचे दागिने आणि दुकानातील घरी असलेली एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम ही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी वरोरा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांचे सह चंद्रपूर गुन्हे शाखेची चमू घटनास्थळावर पोहोचून त्यांनी घटनेची शहानिशा केली. चंद्रपूर वरून श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. वरोऱ्याचे
उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांचे सह ठाणेदार दीपक खोब्रागडे घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हलविले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. वरोरा शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या चोऱ्या चिंतेचा विषय झालेला आहे.