
वनविभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह?
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी.
परवानगी एका झाडाची आणि तोड दुसऱ्या झाडाची असा प्रकार खरूस खुर्द येते नुकताच घडला. याविरुद्ध वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजा खरूस खुर्द येथील शेतकरी
देवराव काशिराव ब्रिदाळे यांनी हे सर्वे नंबर 21 व 19 या सामायिक धूऱ्या वरील आडजातिची 3 झाडे तोडण्याची परवानगी वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयात मागितली. त्यानुसार त्यांना सामायिक धूऱ्यावरील 2 कडू लिंबाची व एक गोंदनीचे झाड तोडण्याची परवानगी मिळाली. मात्र देवराव काशिराव बिरदाळे यांनी परवानगी मिळालेले झाड न कापता रात्रीच्या वेळी शेजारी सुशीलाबाई आनंदराव बिरदाळे यांच्या शेतातील आपट्याचे झाड विना परवानगी तोडले. सदर झाडाशी शेतकरी सुशिलाबाई आनंदराव बिरदाळे यांच्या धार्मिक भावना जुळलेल्या होत्या. त्यामुळे त्या अतिशय संतापल्या आणि त्यांनी याची तक्रार दाखल केली.
सदरचे सर्वे नंबर 21 व 19 या सामायिक धूऱ्या चा वाद या आधीही उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कोर्टात सुरु असताना देवराव काशिराव बिरदाळे व त्यांचा मुलगा रामेश्वर देवराव बिरदाळे यांनी सूडभावनेतून आणि नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने सुशिलाबाई बिरदाळे यांच्या शेतातील झाड कापल्याचे सुशिलाबाई बिरदाळे यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे परवानगी असलेले झाड न कापता शेजारच्या शेतातील झाड देवराव बिरदाळे यांनी कापली आणि या तोडलेल्या झाडांचा पंचनामा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नसेल का? की यामध्ये काही देवाण घेवाणीचा प्रकार झाला या बाबत उलट सुलट चर्चा सध्या गावात सुरु आहे तरी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी सुशिलाबाई आनंदराव बिरदाळे यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या कडे केली आहे.
चौकट –
परवानगीने झाड कापण्या साठी आल्या नंतर सामायिक धूऱ्या वरील दोन्ही शेतकऱ्याच्या उपस्थिती मध्ये झाडें कापणे गरजेचे होते तसेच दोन्ही शेतकऱ्याची संमती आवश्यक असताना सुशीलाबाई आनंदराव ब्रिदाळे यांच्या अनुपस्थिती मध्ये त्यांच्या हद्दीतील झाड रात्री परस्पर कापल्याने वनविभागाच्या कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
प्रतिक्रिया –
याबाबत माझ्या कार्यालयाला तक्रार प्राप्त झाली आहे. विनापरवानगी कापलेली झाडे जप्त करून यावर आम्ही दोषीवर निश्चितच कारवाई करू.
सुदर्शन पांडे,
आर एफ ओ, (वन्यजीव) उमरखेड
