महिला प्रबोधन हळदीकुंकू तीळगुळ व शहीद सैनिक पत्नीचा सत्कार


राळेगाव : श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव मानवसेवा बहुउद्देशीय संस्था राळेगावच्या वतीने महिला प्रबोधन हळदीकुंकू तीळगुळ कार्यक्रम संपन्न झाला. त्यात श्रीमती यमुना ताई मधु मेश्राम व रेखाताई वसंतराव उईके ह्या शहीद सैनिक पत्नींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तीळसंक्रांतीचा सण म्हणजे स्त्रीला स्त्रीकडून दिला जाणारा मान आहे.त्यातून स्रियांमध्ये मैत्रीभाव वाढतो. मात्र यावेळी महिलांमधील विधवांचा मोठा वर्ग यापासून वंचित राहत आला आहे, असे सुबुद्ध महिलांच्या लक्षात आले. राज्यघटनेने भारतीयांना समतेचा अधिकार दिला. पुरोगामी महाराष्ट्र शासनाचा मे २०२२ मध्ये विधवा प्रथा बंदी कायदा झाला. परंतु महिला अनेक जाचक रुढींमध्ये अडकल्या. त्यांच्यात
.सधवा- विधवा भेदामुळे महिलांमध्ये दरी निर्माण झाली. हे सर्व अज्ञानामुळे घडत आहे. तेव्हा स्त्रीनेच आता काळाच्या कसोटीवर विवेकी विचार आणि वर्तन केले पाहिजे असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. अज्ञान,अंधश्रद्धेला फाटा देत सुशिक्षित महिला एकत्र येत हळदीकुंकू त्यांनी तिळगूळ व प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला. संचालन माधुरीताई डाखोरे अध्यक्षा एकल महिला बचत गट राळेगाव यांनी केले. राळेगाव नगरपंचायतने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करावा, यासाठी गुरुदेव सेवा मंडळ आणि उपस्थितांना आवाहन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी प्रसंगोचित भाषणे केली. त्यात
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अहिल्याबाई माकोडे यांनी महिलोन्नती, संगिता पिंपरे मॅडम यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, माजी नगराध्यक्ष मालाताई खसाळे यांनी महिला आणि स्वच्छता , ऍड.रोशनीताई कामडी यांनी व्यसनमुक्ती विषयावर, तर भावनाताई खंगण यांनी विधवा प्रथा उच्चाटन व संक्रातीचे महत्त्व विषद केले. माधुरीताई डाखोरे यांनी स्वरचित परिवर्तन गीत आशाताई कर्रेवार यांच्यासह सादर केले. राजश्री ओमप्रकाश बुरबुरेंनी आभार मानले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू लावून, तिळगूळ आणि सावित्रीबाई फुले पुस्तकांचे वाणं वाटप झाले. गुरुदेव सेवा मानवसेवा बहुउद्देशीय संस्था राळेगाव यांनी महिलांसाठी व्यासपीठ व सर्व सिध्दता उपलब्ध करून देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतीत उतरवण्याचे कार्य केले, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत होती.