
प्रतिनिधी: प्रविण रमेश जोशी
यवतमाळ
सध्या पशुखाद्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. सरकी पेंडीचे भाव चढेच असताना ज्वारी, मका, सोयाबीनचे दर वाढल्याने पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दुपटीने भाव वाढविले आहेत. त्या तुलनेत दुधाची दरवाढ होत नसल्याने दूध उत्पादक चिंतेत आहेत.
दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईमुळे दुग्ध व्यवसाय करणे पशू पालकांना कठीण झाले आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करीत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर भाजीपाला, फूलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन असे व्यवसायही काही शेतकरी करू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. मात्र, वाढत्या महागाईचा फटका शेतीपूरक असलेल्या व्यवसायांनाही बसला आहे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पशुधनासाठी सरकी, मक्का चुन्नी, हरभरा चुन्नी, सुग्रासला अधिक मागणी असते. पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाली असली, तरी दुधाचे भाव मात्र जैसे थेच आहेत. दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशुखाद्यावर अधिक खर्च होत असल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने पशुधन विक्री करावे लागणार काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
