विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू,

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने यात दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना बोरी इचोड शेत शिवारात आज दि २३ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली.

अशोक खिरटकार व संदीप चिडाम रा बोरी इचोड यांच्या मालकीच्या म्हशी सकाळच्या दरम्यान बोरी इचोड येथील संजय लिचडे यांच्या गावालगत असलेल्या शेतात चरायला गेल्या होत्या.शेतातून जाणारी वीजवाहक तारा तुटून पडली होती.ह्यावेळी म्हशींचा चरतांना शेतातील तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे झटका बसल्याने दोन्ही म्हशीचा मृत्यू झाला. यामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे दिढ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहीत समजताच गावातील नागरिकांनी शेतात धाव घेतली व माहिती तलाठी वडकी वीज कार्यालय व पोलिसांना कळवली. गावचे लाइनमन कैलास मेश्राम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून विद्युत पुरवठा बंद केला. तलाठी व पोलिसांनी घडलेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा केला. संबंधित नुकसान झालेल्या दोन्ही शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी बोरी इचोड येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बोरी इचोड येथे घडलेली घटना ही तालुक्यात पहिलीच घटना नसून अश्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मुके जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या कित्येक घटना परिसरात समोर आल्या आहे.मात्र वडकी वीज महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे यावर उपाययोजना करण्यात येत नसून उलट अश्या घटनेत वाढ होतांना दिसून येत आहे.शाखा अभियंता हे फक्त नावालाच असून नागरिकांच्या प्रश्नाचे कधी निराकरण करत नाही.परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या दोन महिन्यांपासून विद्युत पोल पडून आहे या देखभाल दुरुस्तीकडे महावितरण विभाग कायमचे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.महावितरणचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देतात.या पोल दुरुस्तीबाबत काही शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा लेखी तोंडी महावितरणला निवेदन दिली मात्र त्या शेतकऱ्यांच्या निवेदनाला वडकी महावितरण विभाग केराची टोपली दाखवीत असल्याचे दिसून येत आहे.अश्या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.