
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कला,वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव येथील रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे स्वयंसेवकानी ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथील आयसीटीसी (ICTC) केंद्रास दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल दौलतकर यांच्या नेतृत्वात शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही./एड्स प्रतिबंध, निदान प्रक्रिया व आरोग्य विषयक माहिती जाणून घ्यावी तसेच जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश या अभ्यासदौऱ्यामागे होता.
या अभ्यास दौऱ्याच्या मुख्य मार्गदर्शक डॉ. वर्षा बडणाखे, समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव यांनी आयसीटीसी केंद्राचे कार्य, एच.आय.व्ही. चाचणी प्रक्रिया, गोपनीयता, समुपदेशन सेवा, उपचार आणि पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की – “समाजातील अज्ञान व गैरसमज दूर करणे आणि एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींशी सन्मानाने व सहानुभूतीने वागणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
यानंतर मा. श्री. श्रीकांत लाभसेटवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय यांनी एच.आय.व्ही. नमुना संकलन, लॅब प्रक्रिया, सुरक्षित रक्तदान व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंध आणि सामाजिक जागरूकतेची शपथ देत जबाबदारीने समाजात माहिती प्रसारित करण्याचे आवाहन केले.
या अभ्यास दौऱ्यात ग्रामीण रुग्णालय राळेगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ उमेश मडावी यांनी एचआयव्ही एड्स तसेच सिकल सेल बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सिकलसेल सारख्या रोगाला थांबवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहेत असे मत त्यांनी मांडले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विशाल दौलतकर यांनी रासेयो स्वयंसेवकांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व आरोग्य जागरूकतेद्वारे सामाजिक परिवर्तन घडवावे, असे सांगितले व उपस्थित ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे व आयसीटीसी विभागातील सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या अभ्यासदौऱ्यास डॉ. श्वेता वागदे दंतचिकीत्सक, पूजा गेडाम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल दौलतकार, ग्रंथपाल श्री सुरेश कुलकर, रासयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ शालिनी हटवार रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज गोबरे उपस्थित होते.
या शैक्षणिक भेटीमध्ये NSS स्वयंसेवकांनी आयसीटीसी केंद्राची प्रत्यक्ष माहिती घेतली व आरोग्य क्षेत्रातील कार्यप्रणाली समजावून घेतली. विद्यार्थ्यांनी अशा माहितीपूर्ण उपक्रमांद्वारे ज्ञान वाढीस लागते व जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संवेदनशीलता विकसित होते, असे मत व्यक्त केले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तज्ज्ञांनी दिली. हा अभ्यास दौरा अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरला.
