सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाऱ्हा-१ परिसरात अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. नियमबाह्यरित्या सुरू असलेल्या या उत्खननाबद्दल स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने तक्रारी होत असल्या तरी महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नाही, अशी भावना ग्रामस्थांत निर्माण झाली आहे.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, महसूल विभागाचे काही कर्मचारी वाऱ्हा गावातीलच असल्याने त्यांना प्रत्येक हालचालीची पूर्ण माहिती मिळत असते. तरीदेखील कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संशय नागरिकांमध्ये वाढत आहे.यातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे, वाऱ्हा गावातीलच एक जबाबदार नागरिक स्वतः अवैध रेतीउपशात सहभागी असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. त्यामुळे गावातील प्रशासन व स्थानिक महसूल यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रेतीउपसा बंदी असताना देखील सर्रासपणे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी उत्खनन अधिक सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे नदीपात्रासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून भविष्यात पूरपरिस्थितीची शक्यता वाढणार असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.गावातील जबाबदार पदाधिकारी, महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की—अवैध उत्खनन थांबवण्यासाठी विशेष पथक नेमावे
गावातील संबंधित महसूल कर्मचाऱ्यांची चौकशी करावी दोषींवर गुन्हे नोंदवून कठोर दंडात्मक कारवाई करावी,अवैध रेतीउपसा हा केवळ महसुलाचे नुकसान नाही तर पर्यावरणाचा मोठा प्रश्न असल्याने तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे.
