
हिंगणघाट समुद्रपूर सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत, अनंतचतुर्दशीच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी यांच्या दालनात आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.शासकीय सुट्टी असतानाही घेण्यात आलेली ही बैठक म्हणजे प्रशासनाचे व आमदार समीर कुणावार यांचे जनहिताशी असलेले बांधिलकीपूर्ण कार्य अधोरेखित करणारी ठरली.
बैठकीत धपकी, घरकुल योजना व जमीनपट्टा यांसारखे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न चर्चेत घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात आले. हमदापूर व सिंदी (रेल्वे) परिसरातील पट्टा समस्यांचे निराकरण आणि गावोगावी गरजूंना घरकुल उपलब्ध करून देण्याचा ठोस मार्ग काढण्यात आला. यामुळे नागरिकांना तातडीचा दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे.याशिवाय भटके व विमुक्त जमातींच्या जाती प्रमाणपत्रांच्या अडचणींवरही सखोल चर्चा होऊन शिक्षण, शासकीय योजना आणि रोजगाराच्या संधींमध्ये त्यांना अडथळे येऊ नयेत यासाठी प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णायक उपाययोजना आखण्यात आल्या.
विशेष म्हणजे, या सर्व विषयांचा शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा होऊन नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी येत्या १५ दिवसांत आढावा बैठक घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.अनंतचतुर्दशीसारख्या पवित्र दिवशी घेतलेली ही बैठक म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
