
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील निंगनूर अनंतवाडी येथील बेपत्ता मुलीचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी तालुक्यातील निंगनूर, अनंतवाडी शेतशिवारात उघडकीस आली.
कविता नारायण आगोशे (१७) रा. अनंतवाडी, निंगनूर असे मृत मुलीचे नाव आहे. बिटरगाव पोलिसांना ५ ऑगस्ट रोजी निंगनूर येथील सरपंच बरडे यांनी फोनद्वारे अनंतवाडी, निंगनूर येथील नारायण आगोशे यांचे शेतातील विहिरीत मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विहिरीतून मृतदेह काढल्यानंतर चौकशी केली. यावेळी नातेवाईकांनी मृतक कविता असल्याचे सांगितले. त्यावरून पंचनामा करून मृतदेह
शवविच्छेदनासाठी ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक मुलगी ३ ऑगस्ट रोजी घरून शेतात गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे ४ ऑगस्टला तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान शनिवारी अल्पवयीन मुलीचा मृतदेह शेतातीलच विहिरीत आढळून आला. मृतक ही तिच्या आईसोबत रोज शेतात काम करायला जात होती. मृतक ही थोडी मतिमंद असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे अधिक तपास ठाणेदार सुजाता बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गजानन खरात, दत्ता कुसराम करीत आहे.
