करंजीत एकाच रात्रीत दोन दुःखद घटना,महिला मृत तर युवकाने घेतले विष

ढाणकी / प्रतिनिधी :
प्रवीण जोशी


ढाणकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, करंजी या गावात दिनांक १८ सप्टेंबर च्या रात्री दोन दुःखद घटना घडल्या. जणू काही काळरात्रचं करंजीवासीयांवर कोसळली. येथील महिला रात्री झोपेत अचानक मृत पावल्यामुळे, सकाळी सर्वत्र गावात एकच खळबळ उडाली. सुनिता संदीप मुखडे (३२) असे मृत महिलेचे नाव असून, सुनिता आपल्या चार वर्षाच्या मुली सोबत घरी एकटीच राहत होती. पती कामानिमित्त बाहेरगावी राहत होते. सासरे देवदर्शनासाठी तीर्थयात्रेला गेले होते. सासू आधीच मरण पावली असल्यामुळे, मृत महिला आपल्या लहान मुलीसह करंजी येथे एकटीच राहत होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पती बाहेरगावी कामाला निघून गेला. रोज प्रमाणे महिला आपल्या मुली सोबत घरात झोपली, परंतु सकाळी ते दार उघडत नसल्याकारणाने, शेजाऱ्यांनी आवाज दिल्यानंतर त्या चार वर्षाच्या चिमुकलीने दरवाजा उघडला. शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी ताबडतोब महिलेला घेऊन ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं.
तिथे सुद्धा वेळेवर कोणतेच डॉक्टर वगैरे हजर नसल्यामुळे, डॉक्टरांना येण्यास एक तास उशीर झाला. आणि एका तासानंतर डॉक्टरांनी सदर महिलेची तपासणी केली असता, तिला मृत घोषित केले. असं उपस्थित सांगत होते.
आणि या घटनेच्या दोन तास अगोदरच, करंजी येथीलच नितेश ( कान्हा )प्रकाश मोतेवार या २१ वर्षीय युवकाने विष प्राशन केले म्हणून त्याला सुद्धा दवाखान्यात आणल्या गेले होते. परिस्थितीचे गांभीर्य बघता डॉक्टरांनी त्याला उमरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर केले.
सदर दोन्ही घटना एकाच रात्रीत, एकाच गावी घडल्यामुळे करंजी गावावर शोककळा पसरली.