वणी शहरातील चिखलगाव रेल्वेगेट ते वरोरा रेल्वेगेटपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामात अनियमितता

२१ कोटी रुपयांच्या काँक्रीटीकरण रस्ता बांधकामाची गुणवत्ता व घनता तपासुन संबंधितांवर कारवाई करा – रवि बेलुरकर

वणी :

येथील चिखलगाव रेल्वे गेट ते टिळक चौक , वरोरा रेल्वे गेट पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. 20 कोटी ८१ लाख ६५ हजार ६४३ रुपये खर्चाच्या या कामात अनियमितता असुन नियम धाब्यावर बसवून हे काम करण्यात येत असल्याची तक्रार भाजपचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा येथे तसेच गुणनियंत्रक विभाग अमरावती येथे केली आहे.

वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत सुरू असलेल्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकामात आतापर्यंत झालेल्या कामाची गुणवत्ता निकुष्ट दर्जाची असुन, या रस्त्याला आतापासूनच भेगा पडल्या आहे, नालीचे काँक्रीट बांधकाम कुठे कमी तर कुठे जास्त लेव्हल न पाळता आधे अधुरे काम करुन सोडुन दिले आहे. या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम पांढरकवडा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखी खाली सुरू आहे. असे असले तरी संबधीत ठेकेदाराकडून निविदेत असलेल्या अटी व शर्थिचे पालन केले जात नाही. कंत्राटदाराने निवेदेत दाखविलेल्या आर एम सी प्लांटची जागा व प्रत्यक्ष आर एम सी पुरवठ्याची जागा निश्चित नाही. प्लांट एम ६० कागदावरच असुन स्काडा रिपोर्टहि संशयास्पद असल्याचा आरोप रवि बेलुरकर यांनी तक्रारीतुन केला आहे.
या कामात साडेसात मीटर रुंदीची अत्याधुनिक पेवर व्हायब्रेटर मशीन कामावर नसून आजपर्यंत या कामावर ही मशीन वापरण्यात आली नाही असे निवेदनात म्हटले आहे. तसेच चिलिंग प्लांटही कोठेच निदर्शनास आले नाही. या कामावर वाळू स्किनिंग व वाँशिंग युनिट व रस्त्याला तांत्रिकरीत्या स्कँपिंग करण्यात आलेले नाही.
या कामाची माहिती देणारा फलक (बोर्ड) लावण्यात आलेले नाही. या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर यानी तक्रारीच्या निवेदनातुन केली आहे.