
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शहरात राज्य शासनाने तहसील कार्यालयाची प्रशासन इमारत तयार करून दिली आहे मात्र तालुक्याचा कारभार सांभाळायला लागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रिक्त पदांच्या फेऱ्यात अडकला आहे व महसुली यंत्रणा गतिमान व पारदर्शक होण्यासाठी कार्यरत असलेल्या तहसील कार्यालयास रिक्त पदाचे ग्रहण असून अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालयात निवडणूक विभागतील एक, तर महसूल सहाय्यक चार, शिपाई तीन ,वाहन चालक एक, मंडळ अधिकारी दोन,तलाठी सात आदी रिक्त पदे असून मागील काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयातील तहसीलदार , निवासी नायब तहसीलदार निवडणूक विभागातील नायब तहसीलदार यांची बदली झाली होती त्यानंतर काही दिवसानंतर तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार रुजू झाले मात्र निवडणूक विभागातील नायब तहसीलदार अद्यापही रुजू झाले नसल्याने येथील संजय गांधी निराधार योजनेतील नायब तहसीलदार यांना निवडणूक विभागाचा पदभार सांभाळावा लागत असल्याने संजय गांधी निराधार योजनेतील कामे लेंगळलेली होती त्याच प्रमाणे इतरही कामांना विलंब होत असल्याने तहसील कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. तालुक्यातील नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात उत्पन्नन दाखले ,जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र ,संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड विविध कामासाठी येत असून असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास सहन करावा लागत असून तहसील कार्यालयातील असलेली रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी तालुक्यातील जनतेनी केली आहे.
