
. हिंगणघाट: प्रमोद जुमडे
नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त स्थानिक शिवाजी उद्यानात जलपात्र व दाणापात्राचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महंत स्वामी सुरेशशास्त्री महाराज होते. तर आर्किटेक सुहास घिनामिने , ज्योती धार्मिक , शरद बुटोलिया , सौ .कोचर, मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उन्हाळ्यात पक्षांच्याअन्न पाण्याच्या सोयी करीता मोठ्या संख्येने जलपात्र व दानापात्राचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी स्थानिक शिवाजी उद्यानात पक्षांकरिता जलपात्र व पाणीपात्र लावून व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आर्किटेक घिनमिने म्हणाले की उन्हाळ्यात अन्नपाण्यासाठी पक्षांची भटकंती होत असते . अन्न पाण्याअभावी अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. याकरिता प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावर दानापात्र व जलपात्र लावून पक्षांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अध्यकक्षीय भाषणात महंत सुरेश शास्त्री महाराज म्हणाले की आजच्या आधुनिक काळात चिमण्यांची संख्या मोठ्या संख्येने घटत आहे. ही चिंतेची बाब आहे .शहरात वाढणारे काँक्रीटचे जंगल, मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड, मोबाईल टावर यामुळे चिमण्यांचे आश्रय घटत आहे. परिणामी चिमण्यांच्या संख्येत दिवसेनदिवस घट होत आहे. चिमण्यांच्या संवर्धनाकरिता विविध उपाय योजना राबविण्याचे गरज आहे. असे ते म्हणाले. प्रास्ताविक सचिव पराग मुडे यांनी केले तर संचालन प्रा. किरण वैद्य यांनी केले उपस्थितांचे आभार दुर्गा प्रसाद यादव यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी, सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते.
