
सहसंपादक: रामभाऊ भोयर
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुटी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पूर्ण पगार मिळणार आहे. मतदानादिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना पगारी सुटी देण्यात आली, तसेच उद्योग विभागांतर्गत प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुट्टी देणेशक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने दोन तासांची सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नीडवीक ऑफ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अकुशल अनोंदीत, कामगारांनी मतदानासाठी सुटी घेतल्यास दिवसभराची मजुरी बुडणार आहे. निवडणुकीत कोण जिंकले, कोण हरले? आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असल्याचे पालात राहून दिवस काढणाऱ्या लोहार समाजाकडून प्रतिक्रिया व्यक्त केले जात आहे .तसेच शेतकरी, शेतमजूर व्यक्त करीत आहे
कष्टकऱ्यांचे सरकार हवे
• निवडणुका आल्या की, आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. प्रत्यक्षात मात्र दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा अनुभव मतदारांना नेहमीच आहे. यावेळेस मतदारांकडून प्रचाराकरिता आलेल्या उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे.
• निवडणुकीनंतर कष्टकरी व गरजूंना त्यांच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. आमच्या समस्यांचा गांभीयनि विचार केला जातो का? असाही प्रश्न अनोंदीत कामगार, श्रमिक उपस्थित करत आहेत.
चूल पेटणार का ?
• देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणारे, तसेच अकुशल कामगार, मानधनावर काम करणारे कामगार, कर्मचारी, हातावर पोट असलेले कष्टकऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल का? एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटणार का? अशी गरीब, कष्टकरी जनतेची अवस्था आहे.
निवडून आल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे; परंतु सरकार निवडून देणाऱ्या सामान्य जनतेच्या हिताचा विचार होत नाही. सर्वसामान्यांचे जीवन म्हणजे गरिबीत जगणे आणि गरिबीतच मरणे, यासारखेच आहे.
दिवसभर काम केल्यावर ३०० ते ३५० रुपये मजुरी मिळते. आता निवडणूक होण्यापूर्वीही तेवढीच आहे आणि निवडणूक झाल्यावरही तेवढीच राहणार आहे. त्यामुळे कोण निवडून आले आणि कोण पडले? याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे निवडणुकीबद्दल आता काहीच वाटत नाही. – मतदार
