शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा कंटाळा , बंदीभागातील अनागोंदी कारभार


प्रवीण जोशी


ढाणकी व बिटरगाव (बु)असलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी दिसत आहे. बहुतांश कर्मचारी शहराच्या ठिकाणी मुक्कामी राहून कारभार पाहताना दिसत आहे. परिणामी विकास कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या शोधात शहर भर शोधावे लागते. उमरखेड तालुका हा जंगल परिसरात वसलेला असून तालुक्यातील अनेक गावे दुर्गम आहे.तालुक्यातील अनेक गाव, तांडा वरील आदिवासी व इतर समाज अज्ञान असल्यामुळे याचा फायदा घेत या ठिकाणी असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी,आरोग्य सेवक,कृषिसाहायक,वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आदींची प्रत्येक गावात नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे करीत कर्मचारी पुसद, उमरखेड, यवतमाळ शहराच्या ठिकाणी परिवारासह राहतात. आरोग्य सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांचेही मनोबल वाढत आहे.ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षकही जाणे येणे करताना दिसून येतात. उशिरा जाणे आणि लवकर निघणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. अनेकदा तर दुर्गम गावात शिक्षक पोहोचतही नाही. त्या दिवशी विद्यार्थी सुटीचा आनंद घेतात. लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास कोणताही उपयोग होत नाही. तलाठी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कर्मचारी आहे. मात्र तलाठ्यांचे दर्शन गावकऱ्यांना दुर्लभ होते. प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांची गरज असते तेव्हा गावकरी तालुक्याच्या ठिकाणी तलाठ्यांचा शोध घेतात. विद्यार्थ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. ग्राम विकासातील दुवा असलेल्या ग्रामसेवकाचेही असेच आहे. ग्रामसेवक केवळ बैठकीला उपस्थित राहतो. त्यानंतर मात्र त्यांचे दर्शनही होत नाही. वनकर्मचारीही आपल्या कामात कुचराई करताना दिसून येतात. गस्तीअभावी जंगलातील सागवान तस्कर दिवसाढवळ्या तोडून नेत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे शहरात राहून कारभार पाहतात. अनेक कर्मचारी तर मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून घरभाडेही घेतात. या सर्व प्रकारामुळे विकास कामांचा मात्र खोळंबा होत आहे.