
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अनेक नद्या व नाल्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असून, जंगल परिसरातील मुरूम उपसाही बेफामपणे सुरू आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, अवैध वाहतूक करणाऱ्या विनापरवाना ट्रक आणि ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पर्यावरण संवर्धन समिती, राळेगाव यांच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित विषयावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात पुढील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत:
अवैध रेती व मुरूम उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
परवान्याशिवाय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.
महसूल व पोलीस विभागाने नियमितपणे कारवाई करून अवैध उपसा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
स्थानिक प्रशासनाने जनजागृती मोहिम राबवावी.
या समस्येकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास, मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अवैध उपसा आणि वाहतूक थांबवावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समिती व सर्व स्तरातून होत आहे.
