
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच इतर बँकांनी व पतसंस्थांनी फसवणूक केल्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास भारतीय स्टेट बँकेवर आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी व्यापारी वर्ग व्यवहार करण्यास मोठ्या प्रमाणावर येत असतो.
मार्च महिना सुरू झाला आणि ग्राहकांना उष्णतेचे चटके लागायला लागले भारतीय स्टेट बँक शाखेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्राहकाला उष्णतेची झळ लागू नये म्हणून व्यवस्था केलेली नाही. मागील वर्षी सुद्धा वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर व्यवस्था झाली होती. मागील वर्षीचेच बांबू असतील ते बांबू उभे करण्याचे काम असताना त्याला सुद्धा का विलंब लागावा? साहेबाला चहा पाणी करायचे असेल तर कोणाला विचारायची गरज नसेल किंवा जेवणाच्या वेळेलाच साहेब व्यवस्थित जेवण करत असतील ना? मग ग्राहकांना प्रामुख्याने मुख्य प्रवेश द्वारावरील ग्राहकांना झळा लागू नये म्हणून व्यवस्था का केली जात नसेल. कामाला विलंब होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी असे सांगण्यात येते.
साहेब लोकांना माहित आहे की भारतीय स्टेटबँकेची ग्राहकाना गरज आहे किंबहुना बँकेला ग्राहकाची गरज नाही अशी वस्तुस्थिती भारतीय स्टेट बँक शाखा ढानकीची दिसते. एरवी विविध वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून ग्राहक हे आमच्यासाठी दैवत आहे असं सांगायचं आणि ग्राहकालाच उघड्यावर ठेवायचं हे कोण्या कायद्यात सांगितले आहे.
या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था सुद्धा एकदम आत मध्ये केल्या गेली असल्यामुळे अनेक ग्राहकांना येथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे हे ठाऊकच नाही. समोरील भागामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था केल्यास ग्राहकांना सोयीचे ठरते पण ते होईल की नाही हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
विविध चार्जेस लावून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावल्या जाते त्यामध्ये संदेश आणि एटीएमचे चार्जेस लावत असताना एटीएम बाहेर काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने राजकीय पक्षांनी निवेदन दिले. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या भारतीय स्टेट बँकेला आणखीनही ते काम जमले नाही. करतो, पाहतो, होईल, या पुढे काम पुढे जायला तयार नाही.
ग्राहकांनी साहेबां सोबत किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत कसे वागायला पाहिजे व उद्धटपणाने वागल्यास शासनाच्या नियमावलीचा फलक समोरच्या दर्शनी भागाला दिसेल अशा ठिकाणी लावल्या गेला मग पाण्याची व्यवस्था दिसेल अशा ठिकाणी का होत नाही. अशावेळी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मात्र कोणताही फलक लावलेला दिसत नाही साहेबांनी काम वेळेवर पूर्ण न केल्यास त्याला विलंब लागल्यास कागदपत्र गहाळ झाल्यास वेळेत काम पूर्ण न केल्यास साहेबांची तक्रार कुठे करायची व त्यांना कोण्या प्रकारची शिक्षा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद असायला हवे
एकंदरीत काय तर केंद्र शासनाचे कर्मचारी हा साहेबांचा तोरा कायमच असून कायदा सुद्धा साहेबांची बाजू घेऊन सर्व सामान्यावर कारवाई होते. त्यामुळे इथे ग्राहक बोलायला पुढे येत नाही. मागील काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एका साहेबांनी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला होता? त्यामुळे ग्राहक मात्र सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न पडतो. एखाद्या शेतकऱ्याची फाईल गहाळ होते व त्याला ती फाईल पुन्हा बनवायला पैसे लागतात यात वेळही जातो त्यामुळे हे कागदपत्रे हरवतात कोणामुळे जर काम करणारी यंत्रणा कागदपत्र हरवत असतील तर त्याचा भुर्दंड सर्वसामान्य कर्जदारांना का? विषेश लोकांच्या फाईल मात्र अजिबात न हरवता त्यांचे काम तत्काळ होते त्यामुळे इथे दलालांच राज्य फोफावले की काय असा संशय बळावतो.
