
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यंदा खरीप
हंगामातील नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी हवालदिल झाला होता. आज ना उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर घरात ठेवलेला कापूस अखेर हंगामाच्या शेवटी मिळेल त्या भावात विक्रीस काढला. आता शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरात वाढ होत आहे.
मागील आठ दिवसांपासून प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढला असून शेतकऱ्यांचा कापूस संपला असून केवळ पाच टक्के शेतकऱ्यांकडे असलेल्या व पंच्यानव टक्के व्यापाऱ्यांच्या घशात गेलेल्या कापसाची झालेली भाववाढ ही
शेतकऱ्यानं साठी की व्यापाऱ्यांसाठी अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांत रंगत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. हाती आलेल्या कापसाची वेचणी करून दर चांगले मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती. मात्र, कापूस हातात येताच कापसाचे दर कमी होत गेले. व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस सीसीआयला विक्री करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली.
अपेक्षा फोल : मिळेल त्या भावात विक्री
अनेक शेतकऱ्यांनी समाधानकारक भाव नसल्याने घरातच कापूस ठेवणे पसंत केले. मात्र, जानेवारी उजाडला, तरी दर वाढ होत नव्हती. भावढीची अपेक्षा फोल ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विक्री केली.
मार्चअखेरीस दरात तेजी
बऱ्याच शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची विक्री केला. हंगामाच्या सुरुवातीला ७२०० ते ७३०० पासून कापसाचे दर होते. मार्च अखेरीपर्यंत कापसाच्या दरात चांगलीच तेजी आल्याचे दिसत आहे. सद्या ७९०० रुपये दर मिळात असून ८ हजारांच्या टप्प्याकडे कापसाची वाटचाल सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्यानंतर भाववाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
