
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी, राळेगाव – सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन ठमके होते, (जे सीबीएसईचे रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहेत.)कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन आणि सचिव सत्यवान सिंग दूहन यांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात प्रा. मधुकर उबाले यांनी उपस्थितांना महात्मा फुले यांचे शिक्षण, सत्यशोधक समाजाची स्थापना व महिलांच्या सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण झाले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी आर्या पिपराडे हिने अत्यंत प्रभावीपणे केले. तिच्या स्पष्ट व नेटक्या सूत्रसंचालनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडला.या वेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका, घोषवाक्ये आणि गीतांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
सैनिक पब्लिक स्कूलमार्फत असे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत केली जात आहे, हे विशेष उल्लेखनीय ठरले.
