
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अंतर्गत, यवतमाळ जिल्हा शाखेची सभा, समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड, वामनरावजी चटप यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत व पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष अॅड. सुरेशराव वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी, पत्रकार भवन यवतमाळ येथे पार पडली.
मराठी भाषिकांचे वेगळे राज्य असावे, म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. या चळवळीत वैदर्भीयांना, भाषेच्या नावाखाली भावनिक आवाहन करण्यात आले होते. त्यास संपूर्ण विदर्भातील जनतेने पाठिंबा दिला. परिणामी १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. आणि याच दिवसापासून, संपन्न विदर्भ प्रदेशाची अक्षरशः लूट सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी, मुंबईकर व्यावसायिकांच्या सोबत संगनमत करून विदर्भातील खनीज,कोळसा, वीज, वनसंपदा, शेतमाल याचे बेमालूमपणे शोषण सुरू केले. आणि मागील पाच दशकात विदर्भाला भिकार अवस्थेत आणून ठेवले. त्यामुळे १ मे हा महाराष्ट्र दिन विदर्भासाठी काळा दिवस ठरला. विदर्भातील जनतेने आपले वेगळे राज्य असावे, यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने लढा देत आहे. त्याचा एक भाग म्हणून विदर्भातील जनतेने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून त्याचा निषेध करावा असे आवाहन सभेचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी केले.
सरकारचे उच्च शिक्षण धोरण तर अत्यंत भयावह आहे. मागील २ दशकांपासून शिक्षक जवळपास भरती बंद आहे. केवळ कंत्राटी आणि तासिका तत्वावर शिक्षक नेमून अतिशय तुटपुंज्या पगारावर त्यांना बंधुआ मजूर करून टाकले आहे. कित्येक वर्षापासून हे उच्च शिक्षित तरूण विमनस्क अवस्थेत शाळा महाविद्यालयात, शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. फक्त या आशेवर की, कधीतरी आपणास नोकरीत नियमित करण्यात येईल. पण याबाबतीत शासन पूर्णतः डोळे बंद करून आहे. शेतकरी आत्महत्या अजून सुरूच आहेत, आता या मध्ये त्यांच्या घरातली उच्च शिक्षित तरूण मुले – मुली बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. वेळीच त्यांचे समुपदेशन केले नाही तर, आपणास गाव शिवार व मध्यम वर्गातील उच्चशिक्षीत तरुणांच्या प्रेतयात्रेत सामील व्हावे लागेल हे भीषण वास्तव लक्षात घेऊन, येत्या २५ मे ला अमरावती येथे कंत्राटी व तासिका तत्वावर कार्यरत शिक्षक आणि सरपंच मेळावा मेळावा आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती प्रा. डॉ. पी. आर. राजपूत यांनी सभेसमोर प्रस्तुत केली.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठी, घटनेच्या तरतुतीनुसार, जिल्हा व तालुका कार्यकारिणीची पुर्नाचना करण्याचा प्रस्ताव प्रस्तुत करताना, वात्नन वेगळ्या विदर्भाची चळवळ खऱ्या अर्थात जनआंदोलनाचे स्वरूप धारण करेल असा विचार महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे त्यांनी व्यक्त केला.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सभेचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी विदर्भातील अर्थकारण, सिंचन, घरणांचे प्रकल्प, प्रदूषण, वीज, वनसंपदा, बेरोजगारी अशा विविध क्षेत्रातील सरकारी शोषण व वाढता अनुशेष यावर अचूक आकडेवारीसह, अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती प्रस्तुत केली. आणि सर्वांना चळवळीत सामील व्हावे असे आवाहन केले.
या प्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाळे, मधुसूदन कोवे यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले.
सभेला प्राचार्य देवेंद्र पुनसे, डॉ. माधुरी भादे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, अॅड. अजय वामेडिया, युवराज साळवे, राजेंद्र झोटिंग, राहूल खारकर, अरुण जोग, गोविंद चव्हाण, बळवंत मडावी, श्रावण पाडसेनेकून गुरुजी, विश्वास कुंभेकर, प्रल्हाद काळे, मनोज चामेडिया, दिलीपसिंह गौतम, चंद्रशेखर देशमुख, समीर शिंदे, श्रीधर ढवस, चारुदत्त नेरकर, नितीन ठाकरे, सोनाली मरगडे, इत्याती मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
सभेच्या आयोजनासाठी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
