
आगी नंतर चे आक्रंदन…मदतीचा हात ठरला आधार..
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील मारोती ठोंबरे यांच्या गोठ्याला पंधरवाड्याआधी अचानक आग लागल्यामुळे दोन गायी व एक बैल मृत्युमुखी पडले. या आगीत ठोंबरे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्देवी प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत इमर्जन्सी हेल्पलाइन समूहाच्या वॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला.
या समूहाच्या आवाहनाला समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. दातृत्वदात्यांच्या मदतीने एकूण ६५ हजार रुपये जमा झाले. त्यातील ५१ हजार रुपये बैलजोडीसाठी मारोती ठोंबरे यांना आणि १० हजार रुपये उत्तम ठोंबरे यांना सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या राहत्या घरी जाऊन सुपूर्त करण्यात आले.
या वेळी न. प. उपाध्यक्ष जानराव गिरी, डॉ कुणाल भोयर, शशिकांत धुमाळ, संजय पोपट, विनय मुनोत, गोपाल मशरू,अशोक पिंपरे, अनिल डंभारे, इम्रान पठाण, मंगेश राऊत, विनोद नरड, संदिप पेंदोर, धनराज श्रीरामे, अभय फाळके यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दुर्दैवी घटनांमध्ये समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात दिल्यास अशा संकटातून सावरणे सोपे होते, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
