
चहांद:२८मार्च२०२५
महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राळेगाव पंचायत समिती मधून खाजगी विभागात आपल्या धानोरा केंद्रातील सोनामाता हायस्कूल, चहांद या शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. दोन लाखांचे बक्षीस सदर शाळेने पटकावलेले आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे आणि शाळा सुंदर व हव्याहव्याशा असाव्यात याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवली जाते.या स्पर्धेमध्ये सोनामाता हायस्कूल ने सलग दोन वर्षे उत्स्फूर्त प्रतिसादनोंदवला .या स्पर्धेच्या माध्यमातून शाळा सुशोभीकरण, भौतिक सुविधा, शालेय परसबाग, स्वच्छतागृहे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला.सोनामाता हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अनिल धोबे सर यांचं अतिशय सूक्ष्म व उत्कृष्ठ नियोजन व त्यांच्या जोडीला त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभा असलेला त्यांचा शिक्षक वर्गाचा समुदाय तथा सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन, अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून व मेहनत घेऊन आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये उतरवून द्वितीय क्रमांक प्राप्त करून दिला. राळेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा राजू काकडेसर ,धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष पारधी सर व विस्तार अधिकारी शिक्षण विभाग यांनी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग यांचे अभिनंदन पर कौतुक केले आहे. डॉ.य.मो.दोंदे सार्वजनिक शैक्षणीक ट्रस्ट कळंब चे अध्यक्ष प्रा. डॉ. पवन मांडवकर यांनीही सोनामाता हायस्कूलच्या सर्व चमू चे अभिनंदन केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, टप्पा 2 या स्पर्धे अंतर्गत तब्बल दोन लाखांचे बक्षीस जाहीर झाल्याबद्दल पंचक्रोशीतील गावातील नागरिकांकडून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेतील घवघवीत यशामुळे शाळेचा अंतर्बाह्य कायापालट झाला असून यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
