
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मान्सून तोंडावर आला असल्याने शेती कामाला वेग आला ज्यात पेरण्या करून प्रथम प्रक्रिया पार पडण्यास सुरुवात झाली. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उस या पिकांच्या आपल्या भागात पेरण्या करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पेरणी करताना बरोबरच लागणारे खते राळेगांव उपविभागात नसल्याने शेतकऱ्यांना पेरण्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या कृषी केंद्र चालकांकडून डीएपी खताचा काळाबाजार करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. तर याच खतांच्या खरेदी बरोबर लिंकिंग ची एक अट कृषी केंद्र चालकांकडून सुरु करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट चालू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना विना अट डिएपी खत उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केली आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर डीएपी खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जावून ही बाब गंभीर आहे.पिकांच्या वाढीसाठी डीएपी खत अत्यंत आवश्यक आहे. परंतु, सध्याच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पडत आहे आणि यामुळे त्यांच्या शेती उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी केंद्र चालक या खताचे साठे करून जादा दराने विकत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे खते महागड्या भावाने खरेदी करणे परवडणारे नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून खताच्या मोठ्या पिशवी सोबत लहान लहान पुड्यां खरेदी करण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी निर्बंध लावलेले आहे. वास्तविक पाहता ह्या पुड्या खत कंपन्याकडून नमुना स्वरुपात निशुल्क येतात. सदर खतासोबत ह्या पुड्या वापरल्यास खतांचा प्रभावी परिणाम पिकांवर होतो असे सांगून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येते. जर ह्या लहान पुड्या घेतल्या नाही तर शेतकऱ्यांना खत दिल्या जात नाही.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतीची तयारी केली आहे आणि आता खत उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन, आपण तात्काळ राळेगांव उपविभागात डी.ए.पी. खताचा पुरवठा सुरळीत व कोणतीही अट न लावता हे खते शेतकऱ्यााना देण्यात यावे यासाठी कृषी विभागांना आदेश द्यावेत, तसेच तालूक्यातील सर्व कृषी केंद्रावर छापे टाकून साठेबाजी करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळून त्यांचे संभाव्य नुकसान टाळता येईल. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा ईशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी जिल्हाधिकारी विकास मिना यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.