
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा गावातील नवीन स्मशानभूमीला अद्याप रस्त्याचा मार्ग उपलब्ध न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह नेण्याच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल तुडवत आणि नाला ओलांडत अंत्ययात्रा पार पडते, हे दृश्य ग्रामस्थांसाठी अत्यंत वेदनादायी आणि अशोभनीय ठरत आहे.
ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, स्मशानभूमीचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र आजतागायत तिथे पोहोचण्यासाठी कोणताही कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध नाही. वनोजा व उंदरी रस्त्यालगत असलेली स्मशानभूमी ही उंदरी मुख्य रस्त्यालाच लागून आहे. हा रस्ता केवळ अंत्ययात्रेसाठीच नव्हे, तर शेतीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही पांदन रस्ता असल्यामुळे चिखलामुळे त्यांच्या दैनंदिन कामांनाही अडथळा येतो आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तक्रारी व मागण्या केल्या असूनही, प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे. परिणामी, शेवटच्या प्रवासातही माणसाला सन्मानाने नेण्याचे साधन या गावात नाही, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
“स्मशानभूमीपर्यंत सुसज्ज रस्ता उपलब्ध करून द्यावा”, अशी मागणी गावकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम मंजूर करून सुरू करावे, ही ग्रामस्थांची एकमुखी अपेक्षा आहे.
