
प्रतिनिधी//शेख रमजान
यवतमाळ
उमरखेड शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. स्टुडंट वेलफेअर स्कुल दहागांव (उमरखेड) शाळेची बस पळशी फाट्याजवळ पलटी होऊन एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. दिवटपिंप्री येथील कु. महिमा सरकाटे असे विद्यार्थीनी चे नाव असून हिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसचा स्टीयरिंग रॉड तुटला, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. काही ड्रायव्हर्स मद्यप्राशन करून बस चालवतात, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंग्लिश मीडियम शाळांची हवा आणि पालकांची विवशता
आजच्या काळात इंग्लिश मीडियम शाळांचे महत्त्व आणि आकर्षण प्रत्येक पालकाला मोहवते. आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडावे, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून पालक हजारोंची फी भरून या शाळांमध्ये मुलांना पाठवतात. मात्र, या शाळांची कार्यक्षमता, वाहनांची देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे पालक कधीही गांभीर्याने पाहत नाहीत.
सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने बसची नियमित देखभाल, योग्य चालकांची निवड आणि नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. शासनाने देखील अशा खासगी शाळांवर कडक निर्बंध घालून त्यांच्या सुविधांची तपासणी करण्यासाठी प्रभावी धोरणे राबवन्याची आवश्यकता आहे .
चौकट
उमरखेड तालुक्यात आज शनिवारी सकाळी झालेल्या स्कूल बस अपघात प्रकरणी
पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी तत्काळ दखल घेवून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळी तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश दिले. तसेच या अपघतासाठी दोषी असणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील सर्वच शाळांच्या स्कूल बसची तपासणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी दिले. या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या व अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
