!ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्यांना फटका; ‘अपघाताची वाट पाहताय का?’ जनतेचा संतप्त सवाल.

(प्रतिनिधी) शेख रमजान
गेल्या अनेक महिन्यांपासून ढाणकी ते उमरखेड या मुख्य रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून, या मार्गावर आता प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर टाकलेल्या मातीमिश्रित निकृष्ट मुरमामुळे उडणाऱ्या धुळीने या परिसराला ‘वाळवंटा’चे स्वरूप दिले आहे. या जीवघेण्या धुळीतून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. संथ कामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असतानाही, संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींनी देखील या समस्येकडे पाठ फिरवल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रस्त्यावरून एखादा ट्रक किंवा बस गेली की, पुढची ५-१० मिनिटे धूळ बसण्यापर्यंत समोरचे काहीच दिसत नाही. यामुळे दुचाकीस्वारांचे भीषण अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. धुळीच्या कणांमुळे प्रवाशांना डोळ्यांचे आजार आणि दम्यासारखे श्वसनाचे विकार जडत आहेत. रस्त्याचे काम सुरू असताना पाणी फवारणी करणे बंधनकारक असते, मात्र ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून धुळीत काम सुरू ठेवले आहे.काम संथ का सुरू आहे? धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी फवारणी का केली जात नाही? आणि जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला प्रशासन पाठीशी का घालत आहे? मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच एका निकालात स्पष्ट केले आहे की, रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास केवळ ठेकेदारच नाही, तर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता देखील तितकेच जबाबदार धरले जातील. ढाणकी-उमरखेड रस्त्यावर सध्या ‘विझिबिलिटी झिरो’ असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जर असा एखादा अनर्थ घडला, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रवासी करत आहे.चौकट”रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. समोरचे वाहन दिसत नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अधिकाऱ्यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी.”— एक त्रस्त प्रवासी
