
(प्रतिनिधी) शेख रमजान
पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या भागात काल रात्री दरम्यान तक्रारदार शेख हमीद शेख फकरू रा ढाणकी यांचे शेतात झालेल्या हळद चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अत्यंत गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे बिटरगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली हळद जप्त करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
काल रात्री दरम्यान बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख हमीद शेख फत्रू रा ढाणकी यांचे शेतातून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 2 क्विंटल हळदीची पोती किंमत 24000/- ची लंपास केली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हळदीचे वाढते भाव पाहता ही चोरी परिसरात चर्चेचा विषय ठरली होती.
अशी झाली कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनिय बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपी नामे देवानंद संभाजी गायकवाड वय 35 वर्ष रा. चिंचोली ता. उमरखेड यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्हा कबूल केला.
मुद्देमाल जप्त
आरोपीच्या कबुली वरून पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेली संपूर्ण हळद किंमत अंदाजे 24000/- रुपये चा मु्देमाल जप्त केली आहे. सदरची कार्यवाही ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली PSI सागर अन्नमावर, नापोका/2071 मोहन चाटे, पोका /69 सुदर्शन जाधव, पोका/शरद चव्हाण, चालक पोहेका राहुल कोकरे, पोहेका रवी गिते यांनी केली.
या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“शेतमालाच्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांनीही आपल्या शेतमालाची सुरक्षा वाढवावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”
पांडुरंग शिंदे
ठाणेदार,पोलीस स्टेशन बिटरगाव
