
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
एका १६ चाकी महाकाय ट्रकमधून ४५ बैलांची कत्तलीसाठी तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडकी पोलिसांनी तत्परता दाखवत हा ट्रक पकडून बैल व ट्रकसह तब्बल ३६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात रविवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास करण्यात आली. आरोपी राजिंदर सिंग धरमसिंग बाग (४५) रा. टेका नाका नागपूर, नइम कुरेशी अब्दुल रहीम कुरेशी (३८) रा. उपलवाडी नागपूर, मतीन करीम खान (३३) रा. वनदेवीनगर उपलवाडी नागपूर या तिघांवर वडकी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नागपूरकडून हैदराबादकडे जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन वडकी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील देवधरी फाट्यावरनाकाबंदी लावली. दरम्यान पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार, एमएच ४० सीएम ९८४७ या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला थांबवून तपासणी केली. त्या ट्रकमध्ये ४५ नग गोवंश आढळून आले. या बैलांना अमानवीय पद्धतीने कोंबून नेले जात होते. ट्रक चालक, वाहक यांना कोणतीही उत्तरे देता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी जवळपास ११ लाख २५ हजार रुपये किमतीची जनावरे तसेच २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकंदर ३६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
