
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दुर्गम आणि आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या राळेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी केली हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले आहे.यवतमाळ जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत राळेगाव तालुक्याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत आपली योग्यता सिद्ध केली .
जिल्हाधिकारी यवतमाळ याच्या संकल्पनेतून साकार झालेले मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सेलन्स अंतर्गत टार्गेट पीक ह्या उपक्रमाद्वारे सलग दोन महिने वर्ग 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मार्गदर्शनात ऑनलाईन पद्धतीने अभ्यास व सराव घेण्यात आला. सोबतच ऑफलाईन पद्धतीने दर शनिवारी चाचणी घेण्यात आली.
सोबतच शिक्षण विभाग पं.स.राळेगाव येथील गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने व विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनात स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या तज्ञ शिक्षकांद्वारे सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत स्पर्धा परीक्षा,विविध शिष्यवृत्ती परीक्षा याची माहीती होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी अतिरिक्त वर्गाचे आयोजन जि.प.माध्यमिक शाळा वाढोणा बाजार येथे दर शनिवारी सर्व केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आले
या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून राळेगाव तालुका तब्बल 43.47 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले आहेत.यामुळे विद्यार्थी,शिक्षक व सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा यात आनंदाचे वातावरण असून पालकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
अतिरिक्त वर्गाचा राळेगाव पॅटर्न चर्चेत
शिष्यवृत्ती परीक्षा करिता विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी दर शनिवारी अतिरिक्त वर्ग घेण्यात आले. खरं म्हणजे हा एक धाडसी निर्णय होता. विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गाकरिता दर शनीवारी शिष्यवृत्ती क्लास असणाऱ्या सेंटरवर आणणे, पालकांमध्ये तो विश्वास निर्माण करणे, याकरता तज्ञ शिक्षकांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा करता तयार करणे.कोणत्याही निधीची तरतूद नसताना हे शिवधनुष्य राळेगाव शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने व विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांनी लीलया पेलले . यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे अभिनंदन करून या उपक्रमात केंद्रप्रमुख , शिक्षक, विषय साधन व्यक्ती ,पालक व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली , याची परिणीती जिल्ह्यात राळेगाव दुसऱ्या क्रमांकावर येण्यात झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .या राळेगाव पॅटर्न ची जिल्ह्यात चर्चा आहे .
