
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात यंदाचा सीता नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या निमित्ताने नऊ कर्तृत्ववान महिलांना ‘स्वयंसिद्धा सीता सन्मान २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पार पडणार आहे.शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या ऐतिहासिक मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी आणि हनुमान देवस्थान ट्रस्ट, रावेरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.यंदा नऊ महिलांना त्यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनप्रवासासाठी सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती राळेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. सरोजताई काशीकर यांनी दिली. यामध्ये श्रीमती गिताबाई उत्तमराव झोटींग (सिंगलदीप, जि. यवतमाळ)श्रीमती विमल बंडू शेळके (रेवगाव, जि. जालना) श्रीमती मंगला मोहन घडे (वर्धा)श्रीमती ज्योती यशवंत खांडेकर (नागपूर)श्रीमती संध्या शिरीष पान्सी (पांढरकवडा, जि. यवतमाळ)श्रीमती शशिकला रवींद्र डोहे (येरगव्हान, जि. चंद्रपूर)श्रीमती स्वाती अनिल धामंदे (वर्धा)श्रीमती सुनीता विजय कातखेडे (धामनगाव, जि. अमरावती)श्रीमती अल्का गणेश शिंदे (नांदनपूर, जि. अमरावती) या महिलांचा समावेश आहे.सन्मानासाठी निवडलेल्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या मुलांना सक्षम बनवले आहे. त्यांनी लव-कुशांच्या आदर्शाप्रमाणे आपल्या कुटुंबाला उभे करून समाजात सन्माननीय स्थान प्राप्त केले आहे. अशा धैर्यशील आणि आत्मनिर्भर महिलांचा हा भावपूर्ण गौरव सोहळा ठरणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. वामन चटप भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून माजी आमदार सरोज काशीकर उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून सविताताई कौशिक (कार्यकारी संचालक, एबीपी माझा, मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच प्रज्ञा बापट, अनिल घनवट, ललित बहाळे, मधुसूदन हरणे, अॅड. दिनेश शर्मा, सीमा नरोडे, शैलाताई देशपांडे, गीताताई खांदेभराड, गुणवंत पाटील हंगरगेकर, दिपक चटप, विजय निवल, राजाभाऊ पुसदेकर, सतीश दाणी, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र तेलंगे (सरपंच), वर्षाताई तेलंगे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे निमंत्रक शेतकरी संघटना महिला आघाडी व सीता नवमी उत्सव समिती असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश मुटे, सारंग दरणे, अक्षय महाजन, गोपाल भोयर, भास्कर पाटील, प्रकाश काकडे, गजानन झोटींग (उपसरपंच), संदीप तेलंगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे यांनी केले आहे.सीता नवमीच्या पावन पर्वावर होणारा हा सन्मान सोहळा महिलांच्या जिद्द, संघर्ष आणि आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.
