
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एकलारा गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत उभारण्यात आलेला तलाव व मत्स्यबीज प्रकल्प पर्यटकांसाठी एक नवा आकर्षणबिंदू ठरत आहे. नैसर्गिक सौंदर्य, मासेमारीचा आनंद, स्वादिष्ट जेवण आणि ग्रामीण वातावरणाचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो.
या प्रकल्पात तलावाजवळ मत्स्यबीज उत्पादन, मत्सखाद्य निर्मिती, प्रशिक्षण केंद्र तसेच शीतगृहाची सुविधा उपलब्ध आहे. प्रकल्पाचे व्यवस्थापन गजानन आत्राम करत असून, गेडाम मॅडम लेखापाल म्हणून तर तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून मिलिंद चोपडे कार्यरत आहेत. प्रकल्प संचालक शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी महिला बचत गटातर्फे ऑर्डरनुसार चविष्ट आणि पौष्टिक जेवण दिले जाते. तसेच 50 ते 60 लोकांच्या क्षमतेचा हॉल छोट्या-मोठ्या वाढदिवस, कुटुंब समारंभ किंवा पार्टीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण वातावरणात सण-समारंभ साजरे करण्याची एक आगळीवेगळी संधी येथे मिळते.
राळेगावपासून अवघ्या 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्रकल्पाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. तलावाचे नयनरम्य दृश्य, मासेमारीची मजा आणि स्थानिक महिलांच्या हातचे रुचकर जेवण यामुळे एकलारा हे ठिकाण पर्यटकांच्या नकाशावर एक विशेष स्थान मिळवून बसले आहे.
