

सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव कासार (पं.स. राळेगाव) येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक भुमन्ना कसरेवार सर यांची बदली झाल्याने शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व समस्त ग्रामवासीयांच्या वतीने भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करिष्माताई किन्नाके तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच माणिक किन्नाके, उपसरपंच प्रशांत लाकडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक गजुभाऊ ढाले, लक्ष्मणराव लाकडे, धनराजजी लाकडे, खुळे काका, शितलताई लाखु उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविकात मुख्याध्यापक भगवान ठावरी सरांनी कसरेवार सरांच्या शालेय कार्यातील योगदान व गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी कसरेवार सरांनी विद्यार्थ्यांना पुस्तकं, पेन तर शाळेला भेटवस्तू दिल्या. माजी विद्यार्थिनींनी केक व गिफ्ट देऊन सरांचा सन्मान केला. शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. किशोर वानखेडे परिवाराकडून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत लाकडे व राजु उरकुडे यांनी प्रतिमा भेट दिली.
शाळेच्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. केंद्र शाळेचे सुभाष चव्हाण सर, गजानन ढाले, धनराज लाकडे, राजु उरकुडे, प्रणाली जावलेकर व करिष्माताई किन्नाके यांनीही आपल्या भावना व्यक्त करत कसरेवार सरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सरांनी केलेल्या कार्याची माहिती देत “एक आदर्श शिक्षक कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण” सरांच्या रूपाने पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त झाली.
सत्कारमूर्ती कसरेवार सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण करून दिली. “आपल्या आदिवासी बहुल गावात ज्ञानार्जनाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. गावकऱ्यांनी दाखवलेले प्रेम व विश्वास आयुष्यभर स्मरणात राहील. शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या व आपले गाव व्यसनमुक्त करा,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले. संचालन महेंद्र बागडे सरांनी तर आभार प्रदर्शन भगवान ठावरी सरांनी केले.
