
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने तालुक्यातील पशुधनाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या दवाखान्याचा कारभार कळंब येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा कोलमडल्या असून, एकूण २५ मंजूर पदांपैकी १२ पदे रिक्त असल्याने केवळ १३ अधिकाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. या काळात गुरांना योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पशुपालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. गंभीर बाबी उघड कृत्रिम रेतनाच्या आकडेवारीची कोणत्याही दवाखान्यात नोंद नाही.
खाजगी स्तरावर कृत्रिम रेतन केले जात असले तरी परवानगी व पात्रता याबाबत ठोस नियम नाहीत.
त्यामुळे खरा डॉक्टर की बोगस हे ओळखणे कठीण झाले आहे.
पशुपालकांचे हाल पशुवैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने पशुपालकांना दवाखान्यातील परिचरकडून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे जनावरांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, अनेक पशुपालकांना उपचारासाठी खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत असून तेथे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे आर्थिक लूट होत असल्याची ओरड सुरू आहे.
रिक्त पदांचा तुटवडा
पशुधन विकास अधिकारी : १
पशुधन पर्यवेक्षक : ४
पर्यवेक्षक : २
परिचर : ५
एकूण रिक्त पदे : १२
शहरातीलच दवाखान्यात प्रभारी अधिकारी असल्याने पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने रिक्त पदे भरणे व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक करणे आवश्यक असल्याची मागणी पशुपालकांकडून जोर धरत आहे.
