सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात कृषी मंडळ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी मार्गदर्शना पासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून आज पर्यंत कृषी मंडळ अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपीका मध्ये विविध रोगाचा पादुर्भाव दिसुन येत आहे. त्यामुळे त्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मात्र साधा कृषी मंडळ अधिकारी सुध्दा मार्गदर्शना साठी उपलब्ध होऊ शकत नाही. सदर दोन ते तीन वर्षा आधी या परिसरात फवारणी करताना काही शेतकऱ्यांना विषबाधा झाली असुन काहींना अंधत्व आले तर काहींना आपला जीव गमवावा लागला होता मात्र या बाबींची सबंधीत विभागांना कुठल्याही प्रकारचा फरक पडला नसल्याचा दिसून येत आहे.हंगाम सुरू होताच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करायचे असते परंतु कृषी विभाग कुंभकर्ण झोपेमध्ये असल्याचे येथील शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. या परिसरामध्ये कपाशी सोयाबीन या पिकावर फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असते परंतु येथील कृषी मंडळ अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकलत असल्याचे दिसून येत आहे. तर शासनाच्या येणाऱ्या योजनांची सुद्धा कृषी विभाग परिसरातील शेतकऱ्यांना माहिती देत नसल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे. तर याच परिसरामध्ये २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे परंतु अजून पर्यंत येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले नसल्याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. सदर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असताना सुद्धा येथील कृषी विभाग झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसून येत आहे सदर या सर्व बाबीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं व तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावं अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे.
