

सहसंपादक: – रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील येवती गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शेवटी आक्रमक भूमिका घेतली. शुक्रवारी दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडकी येथील वीज महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात संतप्त नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन केले.
गेल्या अनेक दिवसांपासून येवती गावात दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने गाव अंधारात बुडाले होते. या समस्येबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही नेहमीप्रमाणे उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आंदोलनादरम्यान उपसरपंच आशिष पारधी, तसेच पंकज गावंडे, किशोर राऊत, सागर वाघ, वृषभ दरोडे, समीर कुरडकर, अभिजीत बोबडे, संजय कुबडे, विनोद चापले, अक्षय सेवेकर, प्रज्वल चौधरी, आशिष राऊत, प्रशांत झोटिंग, विनायक झोटिंग, उमेश पोहदरे, संकेत राऊत, केतन राऊत, नितीन वैद्य, समीर वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला.
ग्रामस्थांनी “जर पुढील चार ते पाच दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून चक्काजाम आंदोलन छेडू” असा इशारा दिला. या आंदोलनादरम्यान घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांनी घटनास्थळी हजेरी लावून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली.
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येवती गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण असून, महावितरणच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
