
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दोन वर्षांपूर्वी येवती ते पार्डी पोहणा गावापर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराकडून करण्यात आले होते. परंतु अल्पावधीतच या मार्गावरील डांबराचा थर निघून गिट्टी उघडी पडली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्ता पोखरला आहे.
पार्डी फाटा परिसरातील आंतरजिल्हा जोडणाऱ्या पोहणा पुलाच्या पोहोचमार्गासह या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र दोन वर्षांतच रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. अलीकडे ऋषी पंचमी निमित्त डोमाघाट येथे पवित्र स्नान व पूजेसाठी तब्बल १५ हजार भाविक दाखल झाले होते. त्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.
पार्डी येथे सोनामाताची समाधी व पोहणा येथे रुद्धेश्वर महादेवाचे पिंड या धार्मिक स्थळांमुळे वर्षभर भाविकांची व प्रवासी, मालवाहू वाहनांची वर्दळ असते. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
नागरिकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार केली असली तरी बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
