
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जागतिक रेबीज दिन २८ सप्टेंबर निमित्त श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ तर्फे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत रेबीज प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या आठवड्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, ग्रामीण व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम राबवले. यावर्षी “आता, कृती करा – तुम्ही, मी आणि आपला समाज” या संकल्पनेखाली ही मोहीम देशभर सुरू आहे.
दिनांक २६ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील रेबीज प्रतिबंधक लस कक्षात विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा होते. यावेळी महाविद्यालयातील अध्यापक, आंतरवासिता, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. रेबीज प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती जनऔषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी दिली.
रेबीज हा शंभर टक्के प्रतिबंध करता येणारा पण वेळेत उपचार न घेतल्यास शंभर टक्के प्राणघातक आजार आहे, असे त्यांनी सांगितले. जगभरातील मृत्यूपैकी बहुतांश मृत्यू कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. म्हणूनच चावा झाल्यास त्वरित साबण व स्वच्छ पाण्याने १० ते १५ मिनिटे जखम धुवावी आणि तातडीने आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेतून रेबीजमुक्त भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी सर्वांनी जनजागृती करावी व पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करावे, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी केले.
