
त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी : सुमित शर्मा)
संविधानाने आदिवासींना दिलेल्या
आरक्षणामध्ये बंजारा, धनगर समाजाचा समावेश करु नये या प्रमुख मागणीसह इतर २५ मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज भव्य उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपबाजार समिती कार्यालयापासुन मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्र्यंबकेश्वर मंदीर चौक, मेनरोड, कुशावर्त चौक, तेलीगल्ली, पाटील गल्ली, एस.टी. बस स्टॅण्ड मार्गे पुनश्च
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित करण्यात आला. या दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या विविध घोषणांनी परिसर दणाणुन गेला. आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचे फोटो, विविध मागणीचे असंख्य फलक नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते. प्रत्येकाने खांद्यावर आदिवासींचे गौरवपुर्ण उपरणे व डोक्यावर जय आदिवासी, जय जोहार छापलेल्या टोप्या डोक्यावर घातलेल्या होत्या. आदिवासी भगिनींची संख्या लक्षणीय होती. मोर्चामध्ये जवळपास एक हजार आदिवासी सामील झाले होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित झाल्यावर मार्गदर्शन पर सभा घेण्यात आली. यावेळी ईगतपुरी विधानसभेचे माजी आमदार शिवराम झोले, विक्रमगडचे माजी आमदार सुनिल भुसारा, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विनायक माळेकर, माजी नगरसेवक सागर उजे, यशवंत भोये, पेगलवाडी त्र्यंबक चे सरपंच विलास आचारी, एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लकी जाधव, कोपरगाव एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, देवा वाटाणे, अशोक बागुल, हरसुलच्या भारती पवार आदिंनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार गणेश जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी व सहकार्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल बिरसा मुकणे, बाळासाहेब तळपाडे, जगदीश फसाळे, अक्षय नारळे आदिंनी सर्वांचे आभार मानले.
