
भद्रावती, चंद्रपूर: – दिनांक ०६/१०/२०२५ भद्रावती तालुक्यातील आणि चंद्रपूर परिसरातील ग्रामपंचायत खोकरी अंतर्गत मौजा आगरा ता. भद्रावती, चंद्रपूर, येथील नागरिक पिण्याच्या पाण्याचा सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः, पाण्याची समस्या येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली असून, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी त्यांना ३०० मीटरहून अधिक दूर पायपीट करावी लागत आहे.
या गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिक विहिरी आणि टाकीचे पाणी पिण्या करिता वापर करत आहेत. तसेच, मागील ४ ते ५ वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, आणि नाली बांधकामा अभावी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाहीये. परिणामी, सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्यास हानिकारक परिणाम होऊ शकतो
या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कपिल बांदुरकर ,राकेश पिंगे ,महेंक क्षीरसागर, साहिल निखाडे, पंढरी भोयर यांनी ग्रामविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती, भद्रावती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यांनी नागरिकांचे आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन, गावात ‘जलशुद्धीकरण योजना (RO Plant)’ उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
या निवेदनाच्या प्रती, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब चंद्रपूर, मा. तहसीलदार साहेब भद्रावती, व तसेच खा. खासदार, आ. आमदार, आणि इतरांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
