
प्रतिनिधी//शेख रमजान
लहान भावाच्या लग्नाची पत्रिका वाटायला जात असताना खरूस ते टेंभूरधरा रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. माधव मारुती बडेवार (रा. बिटरगाव बु.) असे मृतकाचे नाव असून, ही दुर्दैवी घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर पत्रिका वाटतानाच अपघाताची बातमी आल्याने बडेवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव आपल्या भावाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी टेंभूरधरा येथे जात असताना, खरुस-टेंभूरधारा मार्गावर त्यांच्या मोटारसायकलला भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटवून त्यांना ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आज १५ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लेखी फिर्याद प्राप्त होताच अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येईल. पुढील तपास पोलीस बिटजमादार रोशन सरनाईक यांच्यासह राजू बेलेवार करत आहेत.
लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर पत्रिका वाटतानाच अपघाताची बातमी आल्याने बडेवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
